संत गोरोबा कुंभार

संत गोरोबा कुंभारांचा जन्म (इ.स.१२६७)साली झाला,
असे संत साहित्याचा अभ्यास करणाऱ्या तज्ञांचे मत आहे.संत गोरोबा कुंभारांची समाधी उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरढोकी गावात आहे.गोरोबा पेशाने कुंभार होते.संतश्रेष्ठ नामदेव व ज्ञानेश्वरांचे ते समकालीन होते,संत गोराबा हे ज्ञानेश्वर,निवृतीनाथ,मुक्ताबाई,सोपान आदि संत मंडळींमध्ये वयाने सर्वांहून वडील होते.त्यामुळे सर्व जण त्यांना गोरोबाकाका म्हणत असत.संत गोरोबांनी ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून निवृत्तीनाथ,सोपानदेव, मुक्ताबाई,संत नामदेव,चोखामेळा,विसोबा खेचर आदि संताची,‘कोणाचे मडके(डोके)किती पक्के’अशी प्रत्येकाच्या डोक्यावर मारून परीक्षा घेतली.तेव्हा संत नामदेवांना या गोष्टीचा राग आला होता,त्यावेळी ज्ञानेश्वरांनी त्यांना गुरूपदेश घ्यावयास सांगितले.तेव्हा संत नामदेवांनी विठोबा खेचरांना आपले गुरू केले. 

संत गोरोबा सतत श्री विठ्ठलाचे स्मरण करत,भक्तिरसात ते देहभान विसरून हरवून जात.त्यांची पत्नी गोरोबांना त्यांच्या लहानग्या बाळाकडे लक्ष ठेवयास सांगून पाणी आणवयास गेली असता,श्री विठ्ठलाचे स्मरण करता करता त्यांना,लहानग्या बाळास मडकी घडविण्यासाठी लागणारी चिखलात गाडले गेल्याचे समजले नाही.त्यांची पत्नी पाणी घेऊन येईपर्यत लहानगे बाळ गतप्राण झाले होते.तिच्या हंबरड्याने गोरोबांना जाग आली व ते पश्चाताप करु लागले.नंतर विठ्ठलाच्या कृपेने त्यांचे मुल जिवंत झाले.(अशी अख्यायिका सांगितली जाते.)
त्यांनी चैत्र कृष्ण त्रयोदशी, शके १२३९ (१०एप्रिल १३१७) रोजी समाधी घेतली.